सातवीतल्या आजारी विद्यार्थिनीला परीक्षेची सक्ती; दुसऱ्या दिवशी गमावला जीव

फरीदाबादमधील सीबीएसई शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. शाळेत असतानाच तिला त्रास होत होता. तिने तिच्या आरोग्याबाबत केलेल्या तक्रारीकडे शाळेतील शिक्षकांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळेच तिचा जीव गेला, असा दावा विद्यार्थीनीच्या पालकांनी केला आहे. आराध्या खंडेलवाल असं या विद्यार्थीनीचं नाव असून तिला त्रास होत असतानाही परीक्षेची सक्ती करण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

बुधवारी सकाळी आराध्या शाळेत गेली होती. परंतु, तिथे जाऊन तिची प्रकृती बिघडली. तिने याबाबत तिच्या वर्गशिक्षिकेला सांगितले. परंतु, शिक्षकाने तिचा गणिताचा पेपर पूर्ण होईपर्यंत तिला वर्गात बसायला लावले आणि नंतर तिला सोडण्यात आले.

“आराध्याला अस्वस्थ वाटत होतं. तिला मळमळत होतं. याबाबत वर्गशिक्षकांना सांगितल्यानंतर तिला फक्त शौचास जायाला सांगितले. तिला घाम येत होता”, अशी प्रतिक्रिया आराध्याच्या वर्गमैत्रीणीच्या आईने दिली. मैत्रीणीने तिच्या आईला याबाबत सांगितले होते. त्या पुढे म्हणाल्या की, “आराध्याला चालताही येत नव्हते. तिला डोळेही उघडता येत नव्हते.” आराध्याची तब्येत बिघडल्यानंतरही तिच्या पालकांना याबाबत कळवण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले. शिक्षकांनी तिच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले. तिच्या प्रकृतीविषयी माहिती असूनही पालकांना कळवले नाही, असंही आराध्याच्या मैत्रीणीच्या आईने सांगितले.

घरी आल्यावर आराध्या लिंबू पाणी प्यायली

“दुपारी १.३० पर्यंत आराध्या शाळेतच होती. घरी परतत असताना तिला बसमध्ये उलटी झाली. परंतु, गाडी अस्वच्छ केल्यावरून तिला चालकाने फटकारले. घरी परतल्यानंतर तिने लिंबू पाणी मागितले. त्यानंतर दुपारी ३.३० च्या दरम्यान ती घाईघाईने वॉशरुममध्ये गेली. तिथे तिला उलट्या झाल्या. तिची तब्येत बरी नसल्याचं तेव्हा आम्हाला समजलं. शाळेत काय घडलं होतं ते आम्हाला माहीत नव्हतं”, अशी प्रतिक्रिया आराध्याचे वडिल अभिलाष खंडेलवाल यांनी दिली.

“संध्याकाळी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे ती झोपायला गेली. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास तिला पुन्हा उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे तिचा ईसीजी काढण्यात आला. परंतु, पल्स न आढळल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले”, अस तिच्या पालकांनी सांगितलं.

…तर आराध्या वाचली असती

“शाळेत होत असलेल्या त्रासाबद्दल आधी माहिती दिली असती तर मुलीवर वेळेवर उपचार करता आले असते. ती आजारी आहे, हे आम्हाला माहित नव्हतं, ती सकाळी शाळेत जायला निघाली तेव्हा ती बरी होती”, असंही खंडेलवाल म्हणाले.

दरम्यान, मुलीच्या पालकांनी शवविच्छेदनास नकार दिला. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. तर, कुटुंबाने ट्विटरवर शाळेच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *