मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३५ टक्केच पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी जुलैच्या पंधरवडय़ापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. पावसाचे प्रमाण शहर आणि उपनगरातही कमी असून धरणक्षेत्रातही तुरळक पाऊस पडत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून केवळ ३२.५२ टक्के पाणी जमा झाले आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसांत पावसाचा म्हणावा तसा जोर नाही. मुंबईत दरवर्षी पावसाळय़ाच्या चार महिन्यांत सुमारे २५०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत १६ ते १८ दिवस पाऊस झाला असून महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रांच्या नोंदींनुसार आतापर्यंत शहर भागात ७६४ मिमी तर पूर्व उपनगरात ९२९ मिमी आणि पश्चिम उपनगरात ९९९ मिमी इतका, म्हणजे सरासरी ३५ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या पंधरावडय़ापर्यंत ११०० ते १४०० मिमी (५३ टक्के) पाऊस पडला होता.
