भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस निपुण दाखल, पाण्याखाली बचावकार्य करणारी ठरली दुसरी युद्धनौका

अथांग समुद्रात संकटात सापडलेल्या पाणबुडीपर्यंत पोहोचून तातडीने मदतीचा हात देण्याची भारतीय नौदलाची क्षमता आणखी बळकट झाली आहे. खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप आणि पाणबुडी बचावकार्यासाठी सज्ज असलेली ‘ आयएनएस निपुण ’ ही निस्तार वर्गातील दुसरी डायव्हिंग सहाय्यक युद्धनौका सोमवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नौदल गोदीत झालेल्या सोहळ्यात नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या हस्ते नौकेचा ताफ्यात समावेश करण्यात आला.

युद्धनौका देशातच उभारण्याच्या क्षमतेला आणखी बळ

नौदलाचा ध्वज फडकवताच ‘आयएनएस निपुण’ने औपचारिकरीत्या कार्यरत सेवेत प्रवेश केला. नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन यांच्यासह नौदलातील वरिष्ठ अधिकारी, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी नौदल अधिकारी, मान्यवर आणि युद्धनौकेच्या चमूचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्डने या नौकेची स्वदेशी रचना आणि बांधणी केली आहे. त्यामुळे अत्याधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या युद्धनौका देशातच उभारण्याच्या क्षमतेला आणखी बळ मिळाले आहे.

विशेष डायव्हिंग संकुल

‘आयएनएस निपुण’वर सॅच्युरेशन, हवा आणि हेलिऑक्स डायव्हिंगची सुविधा असून, पाण्याखालील पाहणी आणि हस्तक्षेपासाठी दूरनियंत्रित यंत्रणाही आहे. विशेष डायव्हिंग संकुल, नौकेचे स्थान स्थिर ठेवणारी यंत्रणेमुळे समुद्रात दीर्घकाळ गुंतागुंतीच्या मोहिमा राबवता येणार आहेत.

पाणबुडी बचावाला बळ

पाणबुडीमधील तांत्रिक बिघाडामुळे ती समुद्राच्या तळाशी अडकल्यास तिच्या बचावासाठी ‘आयएनएस निपुण’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘आयएनएस निस्तार’सोबत मिळून नौदलाची डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप, बचाव, जलउद्धार आणि पाणबुडी बचाव क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. जगातील मोजक्याच नौदलांकडे असलेली ही विशेष क्षमता आहे. मानवतावादी मदत आणि बचावकार्यासाठीही या युद्धनौकेचा वापर करता येणार आहे.

आत्मनिर्भरतेच्या दिशेने…

‘आयएनएस निपुण’चे आगमन हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नौदल, हिंदुस्तान शिपयार्ड आणि देशातील विविध उद्योगांच्या समन्वयातून ही नौका उभी राहिली आहे. समुद्री चाचण्यांदरम्यान एकाच मोहिमेत तिच्या सर्व जलांतर्गत यंत्रणांनी अपेक्षेप्रमाणेकामगिरी बजावली, हे देशाच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी क्षमतेचे द्योतक आहे, असे नौदलप्रमुख ॲडमिरल स्वामिनाथन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *