दिव्यांग पत्नीवर पतीचे अमानुष अत्याचार; आक्षेपार्ह Video काढून केले व्हायरल, तडीपार पतीला अटक

एका नराधम पतीने आपल्या दिव्यांग पत्नीसोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले; तसेच तिचा विविध प्रकारे शारीरिक छळ करून त्याचे व्हिडिओ नातेवाइकांच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये व्हायरल केल्याचा प्रकार मंगळवारी (१ सप्टेंबर ) उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तडीपार असलेले पतीला अटक केली आहे.

पीडित महिला दिव्यांग आहे. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्या दोघांनी सहा वर्षांपूर्वी एका मंदिरात जाऊन लग्नदेखील केले. लग्नानंतर काही दिवसांपासून तो पीडित महिलेला त्रास देऊ लागला. त्या दोघांना एक मुलगा आहे. दरम्यान दोघे वेगवेगळे राहत होते. मुलगा कोणाकडे राहणार, यावरून त्या दोघांमध्ये मागील आठ महिन्यांपासून वाद होते. या वादातून आरोपीने पीडित महिलेला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे व्हिडीओ काढले.

याबाबत महिलेने सुरुवातीला वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथून महिलेला पिंपरी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. पिंपरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि आयटी ऍक्ट ६६ डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तडीपारीच्या कालावधीत गुन्हा…

या प्रकरणातील आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी आळंदी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यासाठी १० दिवस शिल्लक होते. त्याच वेळी त्याने हा गुन्हा केला. दरम्यान, तो त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात आला. तडीपार गुंड शहरात आला तरीदेखील पोलिसांना माहिती मिळाली नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पीडित महिलेवर तिच्या पतीकडून अत्याचार केले जात होते. पतीने पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून व्हायरल केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.-रुपाली बोबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी पोलिस ठाणे

पीडित महिलेबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. पीडित महिलेवर पतीने अतोनात अत्याचार केले आहेत. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तिच्या सोबत राहणार आहोत.- दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *