डहाणू रेल्वे स्थानकावरून पहाटे धावणाऱ्या डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेमध्ये एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला करून अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने प्रसंगावधान राखत जोरदार प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला. संशयित आरोपी वाणगाव स्थानकाजवळ झटापट करून पसार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
महिला डब्यात तरुण घुसला
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ५.१७ वाजताच्या मेमूमध्ये संबंधित तरुणी महिलांच्या डब्यात एकटी प्रवास करत होती. त्यावेळी २७ ते २८ वर्षांचा एक इसम महिलांच्या डब्यात आला. त्याने गाडी कुठे पोहोचली आहे, अशी विचारणा केली.
गळा दाबून अत्याचाराचा प्रयत्न
त्यानंतर तरुणी एकटी असल्याची संधी साधून त्याने तिचा गळा दाबण्याचा आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. अचानक घडलेल्या प्रकारानंतरही तरुणीने धैर्य दाखवत संशयिताच्या डोळ्यांत बोटे घालून प्रतिकार केला आणि आरडाओरड केली. आवाज ऐकून इतर प्रवासी मदतीसाठी धावले. प्रवाशांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र वाणगाव स्थानकाजवळील झटापटीनंतर तो पळून गेल्याचे सांगण्यात आले.
आपत्कालीन नंबरवर प्रतिसाद नाही
घटनेनंतर तरुणीने ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्काळ मदत न मिळाल्याचा आरोप आहे. रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.
तरुणीच्या धाडसाचं कौतुक
अचानक जीवघेण्या परिस्थितीत सापडल्या नंतरही घाबरून न जाता तरुणीने दाखवलेल्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. मात्र या घटनेमुळे पहाटे एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला डब्यांमध्ये नियमित गस्त, प्रभावी आपत्कालीन यंत्रणा आणि संशयिताचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.
