आक्षेपार्ह लिंक आणि पोस्टमुळे अनेकदा वादाला तोंड फुटते. काही वेळा प्रकरण गंभीर वळणावर पोहोचते. समाजमाध्यमांवरील बदनामीकारक मजकुरामुळे तणावाची स्थिती निर्माण होत असल्याने अशा आक्षेपार्ह लिंक आणि पोस्टवर ठाणे पोलिसांची करडी नजर आहे. त्याचबरोबर आक्षेपार्ह लिंक हटविण्याची मोहीम पोलिसांनी तीव्र केली असून तीन हजारांहून अधिक आक्षेपार्ह लिंक हटवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
काही लिंक आणि पोस्ट वादग्रस्त स्वरूपाच्या
समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अनेक जण तासन्तास ऑनलाइन असतात. प्रत्येक मिनिटाला विविध प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. त्याचबरोबर अनेक लिंकही पाठवल्या जात असल्याचे दिसून येते. यामध्ये काही पोस्ट किंवा लिंक वादग्रस्त स्वरूपाच्या असतात.
पोलिसांकडून कारवाई
आपत्तिजनक किंवा बदनामीकारक पोस्टमुळे आत्महत्येसारखे प्रकारही घडल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. काही वेळा वादग्रस्त राजकीय पोस्टमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, तर काही वेळा कार्यकर्ते आमने-सामने येण्याचे प्रकारही घडतात. राजकीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येत असतात. अशा आक्षेपार्ह लिंक आणि पोस्टबाबत तक्रारी आल्यानंतर पोलिसांकडून त्या हटविण्याची कार्यवाही केली जाते.
पोलिसांच्या ४५४ वेळा विनंत्या
वादग्रस्त लिंकहटविण्यासाठी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ठाणे पोलिसांच्या विनंतीनंतर ३ हजार ४७५ आक्षेपार्ह लिंकपैकी ३ हजार ८३ म्हणजेच जवळपास ८८ टक्के आक्षेपार्ह लिंक हटवल्या आहेत. पोलिसांनी लिंक हटविण्यासंदर्भात ४५४ विनंत्या केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोशल मीडिया लॅबकडून वॉच
ठाणे पोलिसांची सोशल मीडिया लॅब असून, या लॅबच्या माध्यमातूनही आक्षेपार्ह लिंकआणि पोस्टवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. वादग्रस्त पोस्टसंदर्भात तक्रार आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
