कळवा रुग्णालयात जेवणात सापडले झुरळ;अन्नाचे नमुने FDA कडे रवाना ,डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात आढळला हा प्रकार

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलनापूर्वी संबंधित रुग्णाची प्रशासनाकडून भेट घेण्यात आली नव्हती, तसेच घटनेची चौकशीही सुरू झाली नव्हती, अशी कबुली प्रशासनाकडून देण्यात आली.

अन्नपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न

२८ ऑगस्टच्या रात्री वॉर्ड क्र. ६मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळले होते. या प्रकारानंतर रुग्णालयातील अन्नपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले. मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात आंदोलन केले.

मनसे आक्रमक

आंदोलनानंतर डॉ. कदम यांनी संबंधित रुग्णाची भेट घेतली. तसेच डॉ. माळगावकर यांनी रुग्णाकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. संबंधित अन्नपुरवठादार ठेकेदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेने केली. यावेळी आकाश शिंदे, संदीप कडू, दिनकर फुलसुंदर, गौरव केलशीकर, सिद्धेश सिंग आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ठिय्या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चौकशीचे आश्वासन

घटना घडून चार दिवस उलटले तरी संबंधित अन्नाचे नमुने अद्याप अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले नसल्याची बाबही समोर आली. पुढील दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. ‘रुग्णांच्या ताटात झुरळ सापडणे ही गंभीर बाब आहे. केवळ चौकशीचे आश्वासन नको, तर दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे,’ असा इशारा महिंद्रकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *