पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांना मारहाण केली असल्याचं सांगितलं जात असून एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना बापट यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानंद बापट हे मागील काही दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सव काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. डीजेच्या माध्यमातून उत्सवाचं विद्रुपीकरण होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं सांगत डीजेवर बंदी घातली पाहिजे, अशी भूमिका ते मांडत आहेत. सर्वसामान्य पुणेकरांकडून बापट यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला जात असताना काही गणेश मंडळांकडून मात्र विरोध केला जात आहे. अशातच आज विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना एक तरुण तिथे आला आणि त्यांना मारहाण केली. तिथं उपस्थित असलेल्या इतर लोकांनी हल्लेखोर तरुणाला वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या टिळक रडत्यावर डीजेचा दणदणाट असतो त्याच टिळक रस्त्यावर त्यांना मारहाण झाली आहे.
तरुणाकडून झालेल्या मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांनी कारवाईची मागणी केली आहे. “मी प्रतिक्रिया देत होतो तितक्यात एक वेडा तिथे आला आणि माझ्यावर हल्ला केला, कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती. मी जसं म्हणतो घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् अगदी तसंच त्याने करण्याचा प्रयत्न केला. आता पोलिसांकडे सगळे फुटेज आहेत. त्यात पाहून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं म्हणजे त्याला कळेल मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असतं, गुद्याने नाही, अशी प्रतिक्रिया या मारहाणीनंतर बापट यांनी दिली आहे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आले होते. याबाबत पुणेकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. रविवारी पुणे शहरात ‘डीजे’विरोधी सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या संयोजकांनी माघार घेतल्यानंतरही शेकडो पुणेकरांनी रस्त्यावर येऊन ‘डीजे’ला आपला विरोध दर्शवला होता.
