मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-१ या टर्मिनलची दुरुस्ती करण्यासाठी काही उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत.
तिकिट बुक करण्याआधी व्यावसायिकांकडे चौकशी
मात्र, यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. येत्या काळात या उड्डाणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने विमानाचे तिकीट बुक करण्याआधी पर्यटन व्यावसायिकांकडे यासंदर्भात आवर्जून चौकशी केली जात आहे.
विमानोड्डाण नवी मुंबईला नेल्याने पर्यटकांची नकार घंटा
अकासा एअरचे सकाळी ११.३०ला मुंबईहून कोचीनला जाणारे विमान पर्यटकांचे आवडते होते. मात्र, आता हे विमानोड्डाण नवी मुंबईला नेल्याने पर्यटक तिथे जायला नकार देतात, असे पर्यटन व्यावसायिक योगेश लेले यांनी सांगितले. त्याऐवजी मुंबईतून उपलब्ध असलेला दुसरा पर्याय त्यांना हवा असतो. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सकाळच्या वेळचे विमान बेंगळुरूला थांबून मग दिल्लीला जात होते. ते बेंगळुरूला जाणाऱ्यांसाठी सोयीचे होते. इंडिगोचेही बेंगळुरूचे सकाळचे ७.०५चे विमानोड्डाण नवी मुंबईहून सुरू झाल्याने लोकांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विमान उड्डाणांच्या बदलांसंदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला माहिती
मुंबईच्या टर्मिनल-१बरोबरच टर्मिनल-२वरून होणारी आणखी उड्डाणे नवी मुंबईला हलवल्यास प्रवाशांची अडचण आणखी वाढू शकते. येत्या काळातील या बदलाबद्दल नेमकी माहिती देण्यास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून असमर्थता दर्शवण्यात आली आहे. या बदलासंदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला माहिती देण्यात आली असून, त्यावर शिक्कामोर्तब होण्याची प्रतीक्षा असल्याचेही सांगण्यात येत आहे.
विमान कंपन्यांच्या उद्योगावरही परिणाम
नवी मुंबई विमानतळामुळे भविष्यात मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण कमी होणार असला, तरी सध्या विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईला जाण्याचा नाइलाजच आहे, अशी प्रवाशांची भावना असल्यास याचा विमान कंपन्यांच्या उद्योगावरही परिणाम होऊ शकतो, याकडेही पर्यटन व्यावसायिक लक्ष वेधत आहेत.
