न्यायालयात हजर केले असता ऋतुजा पाटील हिला रडू कोसळले. आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने समोरासमोर चौकशी करायची असून अजून एक आरोपी फरारी असल्याचे सांगून पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सहा आरोपींच्या कोठडीत ७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली असून ऋतुजा हिची ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
मोबाईल हरवल्याचा बनाव
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून पुरावे नष्ट केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. एमपीएससीचा अधिकारी विश्वेश्वर नकाते याने पेपरफुटीदरम्यान वापरलेला लॅपटॉप खाडीमध्ये फेकला; तर नुकतीच अटक झालेल्या ऋतुजा पाटील हिने मोबाइल हरवल्याचा बनाव केला.
खाडीत फेकलेला लॅपटॉप सापडला
एमपीएससीचे अभिजित लेंडवे आणि कौटिल्य अकादमीचे प्रवीण पाटील यांनी मोबाइल खराब झाल्याचे सांगत नवीन मोबाइल जमा केले. त्यामुळे या गुन्ह्यातील पुरावे मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी ऋतुजा पाटील हिच्यासह इतर सहा आरोपींना बुधवारी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी विश्वेश्वर नकाते याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लॅपटॉप खाडीमध्ये फेकला होता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. हा लॅपटॉप खाडीतून शोधण्यात आला असून त्यातील डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऋतुजा पाटील तपासात सहकार्य करीत नसून तिचा मोबाइलदेखील जमा करण्यात आला नाही. मोबाइल हरवला असल्याचे ऋतुजा सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रवीण पाटील याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून आर्थिक नोंदीचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले.
