पाकिस्तानी गँगस्टरचा व्हिडिओ लाइक केला, पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना पोलिसांनी उचललं, तपासात काय आढळलं?

सोशल मीडियावर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून करण्यात आलेल्या पोस्ट, व्हिडिओला लाइक करणे पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. गँगस्टर भट्टीचे सोशल मीडिया प्रोफाइल लाइक केल्याने पाच जणांची पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने कसून चौकशी केली. मात्र, भट्टीबाबत त्यांचा अधिक संपर्क अथवा सहभाग नसल्याने त्यांना पोस्ट, रिल्स, व्हिडिओपासून दूर रहा, अशी समज देऊन सोडून देण्यात आले.

पाकिस्तानस्थित गुंड आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय असलेला शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या ५० जणांची राज्य दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) स्थानिक पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली.

चार दिवसांपूर्वी ‘एटीएस’ने राज्यातील विविध शहरांत विशेष मोहीम राबवत सुमारे २०० संशयितांची चौकशी केली होती. त्या तपासातून महाराष्ट्रातील काही तरुण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे विभागात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी ‘एटीएस’च्या २२ पथकांनी कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, कोथरूड, पर्वती, तसेच पिंपरी-चिंचवडमधील चाकण, म्हाळुंगे, वाकड, चिखली, आळंदी, कुदळवाडी आणि जिल्ह्यातील शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव, राजगुरुनगर परिसरात छापे घातले. या कारवाईत ५० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या मोबाइलमधील चॅट, सोशल मीडिया अकाउंट्स आणि अन्य डिजिटल माहितीची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, भट्टीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झालेल्यांना सोडून देण्यात आले; तर काही जणांकडे चौकशी उशिरापर्यंत सुरू होती तपास यंत्रणांच्या माहितीनु सार, पाकिस्तानमध्ये बसून शहजाद भट्टी भारतातील तरुणांशी संपर्क साधत होता. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील तपासात त्याचे असे नेटवर्क उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील काही तरुणांशीही त्याचा संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. ‘एटीएस’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की ‘देशविघातक कारवायांसाठी देशातील तरुणांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीत गंभीर बाबी आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.’

पाकिस्तानातून खात्यात पैसे

‘एटीएस’च्या तपासात ताब्यात घेतलेल्या एका तरुणाच्या बँक खात्यात पाकिस्तानमधून पैसे जमा झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे. भट्टीच्या संपर्कातील अनेक तरुणांमध्ये बेरोजगारांचे प्रमाण अधिक आहे.

‘एटीएस’कडून चौकशी

एकाच वेळी सर्व संशयितांची चौकशी करणे शक्य नसल्याने मुख्य संशयित मानल्या गेलेल्या २३ जणांची चौकशी ‘एटीएस’कडून थेट सुरू करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांची माहिती पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आली असून, चौकशी अहवाल ‘एटीएस’कडे सादर केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *