नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात प्रेमप्रकरणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यानं व्यथित झालेल्या प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 20 वर्षीय तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
चार वर्षांच्या प्रेमाला विरोध
मृत तरुणाची ओळख विशाल विलास जवादे (वय 21) अशी झाली आहे. विशाल हा मंडप डेकोरेशनचे काम करत होता, तसेच ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचं होतं आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे याबाबतीत विचारणाही केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला स्पष्ट विरोध केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 12 जुलै रोजी लग्नाच्या विषयावर दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी 13 जुलै रोजी दुपारी दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. वानाडोंगरी ते संगम गाव मार्गावरील एका मैदानात जाऊन त्यांनी सोबत आणलेलं विषारी औषध प्यायले. विषाचं प्रमाण अधिक झाल्यानं विशालची प्रकृती घटनास्थळीच गंभीर झाली. या मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ दोघांनाही वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी दोघांवर उपचार सुरू केले. मात्र, रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणली
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून विषारी पदार्थ नेमका कोणता होता? तो कुठून आणला आणि या घटनेमागील सर्व परिस्थितीचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, विशालच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे काही ऑटोचालक मित्र मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. त्यांनी संतापाच्या भरात तरुणीच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली.
