TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; प्रत्येक पेपरमागे मुख्य सुत्रधाराला किती रुपये? थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या प्रकरणात, फुटलेला पेपर तब्बल पाच हजार परीक्षार्थींना विकण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे, हा पेपर पुढे कितीही चढ्या किंमतीने विकला गेला, तरी प्रत्येक पेपरच्या विक्रीमागे ७० हजार रुपये या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता याला हवे होते, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. फरारी असलेल्या मुख्य सूत्रधार गुप्ता आणि त्याचा साथीदार सोनूकुमार किशनलाल यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये शोधमोहीम राबवत आहेत.

बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या पत्नीला पाटणा येथून अटक

या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून सुरू असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक झाली आहे. पेपरविक्रीसाठी आलेल्या तिघांना सुरुवातीला पोलिसांनी अटक केली होती; नंतर बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या पत्नीला पाटणा येथून अटक झाली. अटकेतील आरोपींपैकी मिथुनकुमार सिंह हा गुप्ताचा साडू आहे. आग्रा येथील छापखान्यातून टीईटीचा पेपर फुटल्याची बाब तपासात उघड झाल्यानंतर, पोलिसांनी या छापखान्यात पॅकेजिंग विभागात काम करणारे नरेशकुमार मेहोर, बाबूलाल कुशवाह यांच्यासह माजी कर्मचारी संजयकुमार शर्मा यांना अटक केली. यानंतर, आणखी दोन आरोपींना अटक झाली. मात्र, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता आणि आग्रा येथील सोनूकुमार किशनलाल अद्याप फरारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *