काशिगाव मेट्रो स्थानकाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानकात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी प्रवेशमार्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे एकाच मार्गावरील गर्दी आणि प्रतीक्षेचा मोठा प्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे. मात्र, दुसऱ्या मार्गावरील जिन्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने प्रवाशांना त्याची प्रतीक्षा कायम आहे.
मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो सेवा एप्रिलपासून सुरू झाल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या सेवेला मोठा प्रतिसाद दिला आहे. रस्ते वाहतूककोंडी टाळून अल्पावधीत प्रवास करता येत असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिक मेट्रोचा वापर करत आहेत. मात्र, काशिगाव मेट्रो स्थानकाचे काही काम अपूर्ण असल्याने स्थानकात प्रवेश आणि निर्गमनासाठी केवळ भाईंदरकडील एकाच मार्गाचा वापर करावा लागत होता. तिकीट स्कॅनिंगची सुविधाही एकाच ठिकाणी असल्याने सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. मेट्रोचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होत असला, तरी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी किंवा प्रवेशासाठी १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती.
दररोजच्या या गैरसोयीमुळे पर्यायी प्रवेशमार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानुसार पूजा पार्क परिसरातील दुसऱ्या प्रवेशमार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. नवीन प्रवेशमार्गासह अतिरिक्त तिकीट स्कॅनिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱ्या जिन्याची प्रतीक्षा कायम
दुसरा प्रवेशमार्ग सुरू झाला असला, तरी त्या बाजूला अद्याप एकच जिना उपलब्ध आहे. दुसऱ्या जिन्याच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित असल्याने हे काम रखडले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्याची सुविधा आणखी सुलभ होणार आहे.
