इराणच्या हल्ल्यात पुणेकर इंजिनिअरचा मृत्यू; ‘होर्मुझ’मधून जहाजावरुन रात्री 2.49 वाजता कुटुंबाला फोन केला अन्…

इराणजवळच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका आमने-सामने आले असून मागील तीन दिवसांपासून इथे दोन्ही बाजूने हल्ले सुरु झाले आहेत. याच हल्ल्यांदरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये एका पुणेकर तरुणाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये 10 जण जखमी झाले आहेत. ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ या कंटेनर जहाजावरील ‘थर्ड इंजिनिअर’ हेरंब करमरकर असं मृत तरुणाचं नाव आहे. हेरंबचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दुजोरा दिला आहे. रविवारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ येथे ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ जहाजावर एका प्रक्षेपणास्त्राचा मारा झाल्यानंतर हेरंब बेपत्ता झालेला.

प्रक्षेपकाच्या हल्ल्यात इंजिन रुमला आग

मालवाहू जहाज ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ओमानच्या सागरी बॉर्डरजवळून जात असताना एका प्रक्षेपक्षणास्राचा त्याला फटका बसला. या आघातामुळे जहाजाच्या इंजिन रुममध्ये आग लागली आणि जहाज जागीच थांबले. त्यानंतर, कर्मचाऱ्यांनी जहाजाचा नांगर टाकून ते स्थीर केले. त्यानंतर ‘लाइफबोट्स’च्या साहाय्याने अनेक कर्मचारी सुरक्षित बाहेर पडले.

हल्ल्यानंतर हेरंब झालेला बेपत्ता

दुर्घटनाग्रस्त ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ जहाजावर 11 भारतीयांसह एकूण 24 जणांचे कर्मचारी-पथक होते. ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’ने सुरक्षित स्थलांतर केल्यानंतर सुमारे दोन तासांनी त्यापैकी 23 जणांची सुटका करण्यात आली. हल्ला झाला तेव्हा हेरंब इंजिन रुमजवळ असावा असा अंदाज आहे. तो एकमेव व्यक्ती होता ज्यांचा या हल्ल्यानंतर काहीही थांगपत्ता लागत नव्हता. मरीन इंजिनिअर असलेला हेरंब करमरकर मूळ पुण्याचा होता.

दुर्घटनेच्या काही मिनिटं आधीच कुटुंबाशी संपर्क

हेरंबचा पुण्यातील आपल्या कुटुंबाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे 2.49 वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी त्यांने आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. त्याची ही सागरी मोहीम तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु होती आणि त्यानंतर तो लवकरच भारतात परतणार होता. या हल्ल्यांमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरुन अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे अधोरेखित झाले असून, त्याच्या झळा भारताला बसत आहेत.

संयुक्त अरब अमिरातीच्या जहाजांवर हल्ल्याचा प्रयत्न

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ ही व्यापारी जहाजे होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गिकेवरून जात असताना इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही जहाजांवर मिळून 30 भारतीय खलाशी होते.

परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

‘भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोहम्मद जवाद होसेनी यांना बोलावून या घटनेचा निषेध केला. पश्चिम आशियात शांतता व स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचार त्वरित थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही भारताने पुन्हा केले’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आत्तापर्यंत 14 भारतीयांचा मृत्यू

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामध्ये पश्चिम आशियात आत्तापर्यंत 14 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ‘होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडत असताना संयुक्त अरब अमिरातीच्या ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांपैकी 30 जण भारतीय खलाशी होते. यातील ‘अल बाहिया’वरील 12 भारतीय नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झाला, अन्य एक जण जखमी झाला आहे. ‘मोम्बासा’वरील 18 भारतीय नागरिकांपैकी नऊ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भारताची एकूण सात जहाजं पर्शियन आखातात अडकली

भारतीय ध्वज असलेली सात जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात असाल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. ‘सात जहाजांवर 148 खलाशी आहेत, आखातामध्ये वाढलेला तणाव निवळल्याशिवाय ही जहाजे पर्शियन आखातातून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *