मोबाईलमुळे अनेक हास्यास्पद प्रकार आतापर्यंत अनेकदा समोर आले आहेत. मात्र, तेवढ्याच गंभीर घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील लखमीपूर खीरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. पतीने मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून पत्नीने चक्क स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे.
पतीने मोबाईल न दिल्याने पेटवून घेतलेली महिला जवळपास 85 टक्के गंभीररित्या भाजली आहे. स्वत:ला पेटवून रस्त्यावर पडलल्या महिलेला आजूबाजूच्या काही लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही तोपर्यंत ती जवळपास पूर्ण भाजली होती. महिलेला त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पूरनपूर जिल्ह्याच्या पिलिभीतची मूळची रहिवाशी असलेल्या राणी नामक ही महिला आणि तिचा पती कामानिमित्त पीके कॉलेजच्या जवळ राहत होती. राणीने मिठ्ठूशी तीन महिन्यांआधी लग्न केलं होतं. पीके कॉलेजच्या जवळच असणाऱ्या एका दुकानात राणी काम करत असे.
मला आजच मोबाईल पाहिजे…
या घटनेच्या तीनच दिवस आधी राणीचा मोबाईल कुणीतरी चोरला होता. त्यामुळे राणी थोडी चिंतेतच होती. त्यानंतर तिने पतीशी मोबाईलची मागणी केली. आर्थिक अडचणीमुळे पतीने राणीला केवळ आश्वासन दिलं. मात्र, मोबाईल आजच पाहिजे, यावर राणी अडून राहिली.
…आणि भररस्त्यात रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न
पती आजच मोबाईल घेऊन देत नाही म्हणून राणीने चक्क रॉकेल टाकून भर रस्त्यात आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांनी अथक प्रयत्नांनी राणीला वाचवलं. मात्र, ती 85 टक्के भाजली आहे. राणीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
