‘आजा आजा’ म्हणत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला न्यायालयाने दिला दणका, गंभीर आरोपाखाली ठोठावली कठोर शिक्षा

अल्पवयीन मुलीच्या मागे लागत तिची छेड काढल्याप्रकरणी मुंबईतील दिडोशी सत्र न्यायालयाने दोषी व्यक्तीला लैगिंक छळ केल्याच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे. मुलीची संमती नसताना तिला अडवून तिला आजा आजा म्हणण्याच्या कृतीला न्यायालयाने लैगिंक छळ म्हटले आहे. सदर आरोपीला लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (POCSO) दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे.

या प्रकरणाची सुरुवात २०१५ मध्ये झाली. तेव्हा पीडित मुलगी १५ वर्षांची होती. न्यायालयासमोर तिने सांगितले की, शाळेमध्ये असताना तिने फ्रेंच शिकण्यासाठी बाहेरुन ट्यूशन लावला होता. तेव्हा ट्यूशनला जाताना आरोपी तिच्या मागेमागे यायचा. काहीवेळेस तो सायकल घेऊन तिला ‘आजा आजा’ म्हणायचा. तिची छेड काढायचा.

काही दिवसांनी आरोपीचे धाडस वाढल्याने त्याच्या कृत्यांमध्ये वाढ झाली. एके दिवशी कंटाळून तिने रस्त्यावर उभे असलेल्या काही माणसांना आरोपीबद्दल सांगितले आणि त्यांची मदत मागितली. जमलेल्या घोळक्याने आरोपीला पकडण्याचे प्रयत्न केले. पण त्याने वेगाने सायकल चालवत तेथून पळ काढला. एकूण घटनेबद्दल तिने आईवडिलांना आणि ट्यूशनमधील शिक्षकांना सांगितले. आरोपी जवळच्या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे तिला समजले. पुढे आईबरोबर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली.

सप्टेंबर २०१५ मध्ये आरोपी पोलिसांच्या कचाट्यात सापडला. न्यायालयासमोर त्याने घरी बायको आणि तीन वर्षांचा लहान मुलगा एकटेच असून कमावणारं कोणीही नाही असे म्हणत माफी मागितली. २०१६ मध्ये त्याचा जामीन मंजूर करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *