दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाचा मधमाशांच्या भीषण हल्ल्यात करुण अंत झाला. ही घटना खामगाव चिखली मार्गावरील सिंदी नाला परिसरात आज घडली असून खामगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. जगन्नाथ नामदेव देवडे (६५, रा. अंत्रज, तालुका खामगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
खामगाव-चिखली मार्गाने दुचाकीने जात असताना सिंदी नाला पूल परिसरात जगन्नाथ यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाने मधमाशांवर पाण्याचा मारा केला. देवडे याना गंभीर अवस्थेत खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
