भंडारा हादरला! 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीने स्वत:लाच जखमी केलं अन्…; रात्री हॉस्पिटलाबाहेर तुफान गर्दी

भंडाऱ्यामध्ये एक अत्यंत विचित्र आणि तितकाच विकृत प्रकार समोर आला आहे. येथील एका 30 वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणाने 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण मुलीसोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करताना आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिक या मुलीच्या मदतीला धावून आले. त्यांनी या मुलीची सुटका केली. मात्र लोक आता आपल्याला मारतील ही बाब आरोपींला कळताच आरोपीने स्वतःलाच जखमी केलं. रात्री उशीरापर्यंत यासंदर्भातील नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. अखेर पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिकांनी घरची वाट धरली.

आंबेडकर वॉर्ड परिसरात दुपारी सुमारे 12 वाजता आरोपी तरुणाने चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनीच आरोपीला हटकलं आणि पकडल्यानंतर या घटनेसंदर्भात भंडारा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचलो. दरम्यानच्या काळात पिडीत मुलीला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे आरोपीने देखील स्वतःला जखमी केलं असल्याने त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी रूग्णालयात पोहचून आरोपीवर उपचार करून नये अशी मागणी केली. स्थानिकांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

नागरिकांची रुग्णालयाबाहेर गर्दी

आरोपीला नागरिकांच्या स्वाधीन करा अशी मागणी करत रात्री उशीरापर्यंत स्थानिक महिला आणि पुरुष जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर जमले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त लावला होता. अखेर घटनेचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणात पुढील चौकशी करत आहेत.

पनवेलमध्येही घडला असाच प्रकार

नवी मुंबईतील पनवेलमध्ये सार्वजनिक शौचालयात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आली.  वाल्मिकी नगर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयाच्या एका टॉयलेटमध्ये एक अल्पवयीन मुलगी आणि एक तरुण एकत्र असल्याचा संशय स्थानिक नागरिकाला आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या नागरिकाने तात्काळ दरवाजा ठोठावला. नागरिकांनी दरवाजा ठोठावल्यानंतर दरवाजा उघडताच आतमधून अल्पवयीन तरुणी बाहेर आली. नागरिकांनी आतमध्ये पाहिलं तेव्हा तरुण देखील दरवाजामागे लपला होता. यावेळी नागरिकांनी तरुणाला बाहेर काढून बेदम चोप देत पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *