मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या (कनेक्टिंग) लिंबाच्या बोगद्यात पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणारी फॉर्च्यूनर कारपुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला जोरात धडकली. या भीषण धडकेत आयशर टेम्पोसह मार्गावर उलटला तर फॉर्च्यूनर कारचा अक्षरशः चुराडा झाला. या विचित्र भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
तुषार भुमकरचा जागीच मृत्यू
तुषार वामन भुमकर (वय ३५, रा. वाकड, पिंपरी चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, पाच जखमींमध्ये आयशर टेम्पो चालक राजु मुडबे (रा. धाराशिव), कुलदीप पवार (रा. लातूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच फॉर्च्यूनर कारमधील प्रदीपसह इतर तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांची अद्याप समजली नाही.
आयशर टेम्पो मार्गावर उलटला
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार भुमकर हा त्यांच्या फॉर्च्यूनर कारने (क्रमांक -एमएच-१४/एमजी-०००७) चार मित्रांसोबत मिसिंग लिंक मार्गावरुन मुंबईकडे जात होता. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंक मध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या फॉर्च्यूनर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला (क्रमांक-एमएच-०१/सीआर-७०७५) मागून जोरात धडकली. हि धडक इतकी भीषण होती की, आयशर टेम्पो मार्गावर उलटला. या भीषण धडकेत तुषार भुमकर याचा जागीच मृत्यू झाला तर फॉर्च्यूनर कारमधील चारजण जखमी झाले असून, यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच आयशर टेम्पो चालकासह एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
