महाराष्ट्रातील गोविंदांसाठी गुड न्यूज, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने 2026 सालासाठी महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील 1 लाख 60 हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व आणि उपचार खर्चासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली असून, या निर्णयामुळे दहीहंडी मंडळे आणि गोविंदा पथकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, यंदाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे 1 लाख 60 हजार गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. दहीहंडीदरम्यान होणाऱ्या संभाव्य अपघातांचा विचार करून ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक नोंदणीकृत गोविंदाला अत्यल्प प्रीमियममध्ये विमा संरक्षण दिले जाणार असून, त्याचा खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून करण्यात येणार आहे.

अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण

शासन निर्णयानुसार, दहीहंडीदरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास किंवा दोन्ही हात-पाय अथवा दोन्ही डोळ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित गोविंदाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. तसेच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी 10 लाख रुपयांपर्यंत विमा लाभ मिळेल, तर अंशतः अपंगत्वासाठी विमा पॉलिसीतील अटींनुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

उपचार खर्चासाठीही मोठा दिलासा

अपघात झाल्यास केवळ विमा रक्कमच नव्हे, तर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्या गोविंदांच्या वैद्यकीय खर्चाचाही विचार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष उपचार खर्च किंवा कमाल 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत विमा योजनेतून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अपघातानंतर उपचाराचा आर्थिक भार कुटुंबावर कमी होण्यास मदत होणार आहे.

पाठपुराव्यानंतर निर्णय

युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने राज्य सरकारसमोर मांडला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी सांगितले की, गोविंदा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करताना प्रत्येक गोविंदाची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही सरकारची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

या निर्णयासाठी पूर्वेश सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त केले. गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील दहीहंडी मंडळे, गोविंदा पथके आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. अपघाताच्या वेळी आर्थिक संरक्षण उपलब्ध असल्याने गोविंदांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. यंदाचा दहीहंडी उत्सव सुरक्षित, नियोजनबद्ध आणि अधिक विश्वासाने साजरा करण्यासाठी ही विमा योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *