सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, गुप्तांगात जखमा, ‘इन्स्टा फ्रेण्ड’ आरोपीला लॉकअपमध्येही मऊसूद बेड हवा

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी बोलावलं, त्यानंतर तिला तब्बल ३० तास डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या काळात आरोपी निर्भय ऊर्फ आकाश माधव पाखरे (२०, रा. घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट, पाटीलपाडा, ठाणे) याने मुलीचे हातपाय बांधून तिच्या शरीरावर चाकूने २० वार केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

पूर्वनियोजित हल्ला

पीडिता ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे. नागपूरच्या दिघोरी भागातील एका भाड्याच्या फ्लॅटमधून तिची सुटका करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी सांगितले की त्यांना या नियोजित हल्ल्याचे पुरावे सापडले आहेत. मुलीला तिथे २४ तासांहून अधिक काळ ओलीस ठेवण्यात आले होते. सोमवारी उशिरा पोलिसांनी तिथे धाड टाकण्यापूर्वी तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले, त्याचे चित्रीकरण केले गेले, तसेच तिला चाबकाने मारहाण करुन चाकूने वारही करण्यात आले.

पिझ्झा, बेडची मागणी

आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. स्वतःच्या मोबाईल फोनचे तसेच पीडितेच्या फोनचे पासवर्ड सांगण्यासही नकार दिला. त्याने लॉकअपमधील परिस्थितीबद्दल तक्रार केली असून, नाश्त्यासाठी पिझ्झा, उत्तम दर्जाचे जेवण, मऊसूद बिछाना आणि डास प्रतिबंधक क्रीमची मागणी केली आहे, तर दुसरीकडे त्याने काळवंडलेल्या भिंती आणि अस्वच्छ शौचालयांवरही आक्षेप घेतला आहे.

गुप्तांगावर खोल जखमा

नागपूर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या शरीर, मनगट आणि गुप्तांगांवर किमान २० खोल जखमा, चावा घेतल्याच्या खुणा आणि चाबकाच्या फटक्यांमुळे झालेल्या जखमा आढळून आल्या. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ती तीव्र मानसिक आघातातून जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही मुलगी आरोपी निर्भय ऊर्फ आकाशच्या संपर्कात आली होती. आरोपीने स्वतःचे नाव आकाश मेहरा असल्याचे सांगून तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला धमकावून आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवायला भाग पाडल्याचा आरोप आहे.

विमानाने नागपूरला

रविवारी आरोपी विमानाने नागपुरात आला. त्याने दिघोरीत खोली भाड्याने घेतली. सकाळी त्याने मुलीला तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत भेटायला येण्यास भाग पाडले. दुपारी आरोपी तिला भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. तेथे तिचे हातपाय बांधले. तोंडाला रुमाल बांधला आणि चाकूने वार केले.

रविवारी रात्री उशिरापर्यंत मुलगी नातेवाइकांच्या संपर्कात होती. तिचा मोबाइल बंद झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. वडिलांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चौकशीत ती आकाश नावाच्या युवकाच्या संपर्कात असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी आरोपीने लँडलाइनवरून धमकी दिल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या आईशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या दुसऱ्या मोबाइलचा धागा पोलिसांना मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *