नागपुरातील महिला डॉक्टरचा सांगलीत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. खुशी पवन मुंधडा (वय २५, रा. दिग्विजय अपार्टमेंट, शिवाजीनगर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
कुटुंबातील मोठी मुलगी
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातल्या शिवाजी नगर भागात माहेश्वरी समाजातील मुंधडा कुटुंब राहतं. पवन मुंधडा यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, तर त्यांची पत्नी मानसोपचार समुपदेशक. त्यांना खुशी, पार्थ आणि पूर्वा अशी तीन मुलं. त्यापैकी सर्वांत मोठ्या खुशी यांनी २०२४ मध्ये मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
शल्यक्रिया विभागात पदव्युत्तर एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवत दुसऱ्याच वर्षी त्यांनी सांगलीतल्या भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
हॉस्पिटलमधून घरी जाताना अपघात
बुधवारी रात्री अडीच वाजता नेहमीप्रमाणे निवासी सेवा देऊन खुशी या हॉस्पिटलमधून मोपेडने घरी जात होत्या. त्यावेळी कारने त्यांच्या मोपेडला धडक दिली. सोबत दुसऱ्या दुचाकीने प्रवास करणाऱ्या निवासी डॉक्टरने खुशी यांना रुग्णालयात नेले, मात्र कारच्या चाकाखाली चिरडून गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले.
आज, शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका उदयोन्मुख डॉक्टरचा अकाली अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने मुंधडा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
