मारकुट्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे महाराष्ट्रातून तडीपार, मुंबई हायकोर्टाकडून अटींसह जामीन मंजूर

डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण करणारा शिवसेना (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रेला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने गुरुवारी रमेश म्हात्रेची सुटका करण्याचे संकेत दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीसाठी हे प्रकरण कल्याणमधील ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयासमोर ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. रमेश म्हात्रेला कोर्टाने तडीपार केलं असून आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याने महाराष्ट्राबाहेर राहण्याचं मान्य केलं आहे. प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम ए. आंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

गुरुवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहावं लागेल असं सांगितलं होतं. तसंच आपला पासपोर्टही सत्र न्यायालयाकडे जमा करावा लागेल असे निर्देश दिले होते. डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला 9 जुलैला अटक झाली होती.

पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश

मुंबई हायकोर्टाने रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करताना महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. रमेश म्हात्रेसहित सर्व आरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच आठवड्यातून तीन वेळा जिथे राहतील तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

1 ऑगस्टला नाकारला होता जामीन

यापूर्वी 1 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने तपास अद्याप पूर्ण न झाल्याने जामीन नाकारला होता. आरोपींची ओळख परेड, साक्षीदारांचे जबाब तसेच आवाजाचे नमुने घेणे अद्याप बाकी असल्याने मुंबई हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. यावेळी रमेश म्हात्रेचे वकील आबाद पोंडा यांनी कोर्टाकडे कठोर अटी घालून सुटका करावी अशी विनंती केली होती. तपास पूर्ण होईपर्यंत रमेश म्हात्रे महाराष्ट्राबाहेर राहण्यास तयार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र न्यायिक मित्र आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे बाजू मांडणारे वरिष्ठ वकील एस. यू, कामदार यांनी जामीन देण्यास विरोध केला होता.

नेमकी घटना काय?

रमेश म्हात्रेने 6 जुलै रोजी डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयात मारहाण केली होती. एक पुरुष आणि महिला डॉक्टरने नवजात बाळाच्या नातेवाईकांना बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. रुग्णालयातील नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग (NICU) पूर्णपणे भरलेला असल्याने त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं. नवजात बाळाला योग्य वैद्यकीय काळजी मिळणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर नातेवाईकांनी रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला आणि ते आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि डॉक्टरांना अपशब्द वापरत मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *