हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून ठेवण्यात आलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्यानं दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोही मल्लेश डेबेकर (वय 6 वर्ष) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय 4 वर्ष) असं मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
सध्या शेतीची कामे सुरु आहेत. पिकांना कीड लागू नये म्हणून शेतकरी किटकनाशक औषधखरेदी करीत आहेत. धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथील रहिवासी मल्लेश डबेकर यांनी हरबरा बियाणासाठी कीटकनाशक औषध खरेदी करून घरातील खोलीतील पोत्यामध्ये ठेवले होते. 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री आरोही आणि आराध्या ह्या आपल्या आई-वडिलांसोबत घरात झोपल्या होत्या. रात्रीच्यावेळी या कीटकनाशकाचा फैलाव झाल्यानं त्याचा परिणाम कुटुंबातील सर्वांवर झाला.
घरातला आनंद हिरावला
किटकनाशकाचा प्रभाव झाल्यानं आई-वडील आणि दोन्ही मुलींना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काल गुरुवारी रोजी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान आरोही व आराध्याया दोन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला. मल्लेश डेबेकर यांना केवळ या दोनच मुली होत्या. एका दुर्दैवी घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्यानं डेबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बाळापूर येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात दोन्ही चिमुकल्या बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे ग्रामीण भागात बियाणं साठवताना वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आई-वडिलांवर सध्या उपचार सुरु
आई-वडिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धान्याचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी वापरलेल्या औषधानेच दोन चिमुकल्यांचा जीव घेतल्याने संपूर्ण धर्माबाद तालुक्यात प्रचंड हळहळ आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
