पिण्याच्या पाण्यासाठी अख्खा महाराष्ट्र तडफडत आहे. पाऊस नसल्यामुळे पाणी नाही, शेती नाही म्हणून हवालदिल झालेला शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतोय. दुष्काळावर मात करण्यास फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अशी गंभीर स्थिती असताना कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी मानसरोवरातून पाणी आणण्यासाठी चीनचा दौरा करण्याचा घाट भाजपा-शिवसेना युती सरकारने घातला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे हवालदिल झालेल्या शेतक-यांची कुचेष्टा करणारा आहे.
मराठवाडयात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडलेल्या पावसाने दुष्काळी स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाणी नाही, चारा नाही, रोजगार नसल्याने लोक दुष्काळी गावांतून स्थलांतर करू लागले आहेत. सर्वत्र पाण्यासाठी वणवण सुरू आहे. असे असताना नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी राज्य सरकारने शाही यात्रा आखली आहे.
१८ सप्टेंबरला होणा-या शाही स्नानासाठी चक्क कैलास मानसरोवरातून पाणी आणण्याची योजना फडणवीस सरकारने आखली आहे. त्यासाठी फडणवीस सरकार राज्याच्या तिजोरीतील पैशाने शिष्टमंडळ घेऊन चीन दौ-यावर जाणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता, नेमबाज अंजली भागवत, सुंदर ग्राम हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, केईएम रुग्णालयाचे डीन रवी बापट, डॉक्टर आनंद बंग, सुधींद्र कुलकर्णी आणि गृहराज्यमंत्री राम िशदे यांचा समावेश असणार आहे.
शिष्टमंडळाचा हा दौरा ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान असेल. मानसरोवरचे पाणी आणून ते शाही स्नानासाठी कुंडात सोडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाची वणवण सुरू असताना त्यासाठी ठोस पाऊल उचलावे, यासाठी रेल्वेने तात्काळ पाणी आणावे, असा कोणताही ठोस निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला नाही. मात्र कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी सरकारची सर्व यंत्रणा सक्रिय झाली आहे.

