एका गाडीत अडकलेल्या दोन व चार वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींचा श्वास गुदमरुन दुर्दैवी मृत्यु झाला. गुडगावमधील कदरपूर गावात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
हिमाशी (४) आणि रितिका (२) या दोन बहिणी घराबाहेर असलेल्या त्यांच्या सेडान गाडीमध्ये खेळण्यासाठी गेल्या होत्या. खेळत असतानाच अनावधानाने ही गाडी आतमधून बंद झाली. गाडी लॉक झाल्यामुळे गाडीतून बाहेर पडण्याचा मार्ग या छोट्या मुलींना समजलाच नाही.
दुसरीकडे मुलींचा कुटुंबीय शोध घेत होते. या मुलींच्या पालकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्या दोघींना मृत घोषित केल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजेश चेची यांनी सांगितले.
या मुलींचे वडिल सतबीर सिंह हे शेतकरी आहेत. मुलींचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे चेची यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

