रेल्वे अपघातास जबाबदार कोण?

रेल्वे अपघातास जबाबदार कोण?

मागील आठवडयात मधुमंगेश कर्णिक यांच्या मुलाचा अंधेरी स्थानकात लोकलच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारे दररोज अनेक जण रेल्वे अपघातात दगावतात. मात्र या अपघातांची साधी दखल देखील रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून घेतली जात नाही.

मात्र, मुंबई लोकलच्या मार्गावर दररोज १० ते १५ जण दगावत असून याची कोणतीही चर्चा केली जात नाही किंवा कोणी रेल्वे प्रशासनाला जाबही विचारत नाही. या अपघातांच्या घटनांकडे तेवढया प्रखरतेने पाहिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. रेल्वे अपघात होतात, त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, यात दुमत नाही. मात्र काही अपघात हे रेल्वे प्रवाशांच्या चुकीने होतात, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीत होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाबरोबर प्रवाशांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

जानेवारी महिन्यापासून मुंबई उपनगरात लोकलच्या अपघातात २ हजार १९४ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना होणारे मृत्यू, गाडीतून पडून होणारे मृत्यू, रुळाशेजारील खांबाला धक्का लागून होणारे अपघात यांचा सामावेश आहे. मात्र, हे अपघात का होतात याची दखल घेतल्यास अनेक कारणे समोर येतात.

मात्र यावर रेल्वे प्रशासन तेवढे गंभीर आहे, का हा खरा यामागील प्रश्न. होणारे अपघात नेहमीचेच असल्याने रेल्वे प्रशासन याकडे अगदी सहजतेने पाहते. प्रत्यक्षात मात्र अपघातांचा आकडा मोठा आहे. मात्र दुर्दैवाने यावर काय उपाययोजना करावी यावर साधा विचार देखील रेल्वे प्रशासनाकडून केला जात नाही, ही मोठी खंत आहे.

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर असलेल्या रेल्वेच्या सुरक्षा भिंतीला अनेक भगदाडे पाडण्यात आली आहेत. तेथून आसपासच्या वस्तीतील लोक सर्रासपणे ये-जा करत असतात. त्यामुळे यामध्ये अनेक जण रेल्वे रूळ ओलांडताना दगावतात.

मात्र, रेल्वेच्या सुरक्षेला भगदाड पाडले जात असताना रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या आरपीएफला मात्र याबाबत सोयर-सुतक नसल्याचे पाहायला मिळते. या सुरक्षा भिंती तोडणाऱ्यांवर आरपीएफने बारीक नजर ठेवली तर असे प्रकार होणार नाहीत. यामुळे लोक रेल्वे रूळ ओलांडणार नाहीत, परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत आपसुकच घट होईल. याकरता आरपीएफने पादचारी पुलावर आणि फलाटांवर बसलेल्या फेरीवाल्यांना करण्यात येणारी अयशस्वी कारवाईतून वेळ काढून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास हे शक्य आहे.

याशिवाय मागील काही दिवसांत चोरांच्या हल्ल्यात दोन महिला प्रवाशांचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे चोरांनी थेट रेल्वेच्या हद्दीत घुसून प्रवाशांवर हल्ला करण्यापर्यंत  मजल मारल्याचे उघड झाले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान होणा-या लहान-मोठया चोऱ्यांना गांभीर्याने घेत रेल्वे पोलिसांनी याला वेळीच आवर घातला असता तर चोरांना वेळीच लगाम घालणे शक्य होते.

मात्र याउलट रेल्वेच्या डब्यात होणारी पाकीटमारी आणि मोबाईल चोरीच्या प्रकरणांची दखल घेण्यात रेल्वे पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. शिवाय मोबाईल चोरी करताना चोराला पकडून पोलिसांच्या हवाली केल्यास चोरी होत असलेला मोबाईल देखील पोलिसांत जमा करावा लागतो. त्यामुळे मोबाईलसाठी अनेकदा प्रवाशांना रेल्वेच्या संबंधित पोलीस ठाण्याच्या पाय-या झिजवाव्या लागतात. परिणामी चोरांचे चांगलेच फावते. पुढे हेच भुरटे चोर गुन्हेगारीकडे वळून प्रवाशांवर हल्ले करतात.

आज अनेक कारणांनी रेल्वेच्या मार्गावर होणा-या अपघातांचा आकडा पाहता याकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. मुंबईतील वाहतुकीच्या अपु-या सोयी-सुविधांमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे होणा-या अपघातांकडे रेल्वे प्रशासन, संबंधित पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष घालून मुंबईकरांना येणारे ‘लोकल मरण’ थांबवायला हवे.

मुंबई उपनगरीय लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सुविधा पुरवण्यात रेल्वे प्रशासन कमी पडते, यात दुमत नाही. मात्र प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. रेल्वे प्रवासी संघटना, प्रवासी व रेल्वेचे अभ्यासक यांच्या चर्चा करून यावर तोडगा काढणे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *