लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण कालवश; गायनातील ठसका, खटय़ाळपणा हरपला

ठसकेबाज गायनाने ‘लावणी’ला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी दुपारी १२ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गिरगाव फणसवाडी येथील निवासस्थानी सुलोचना चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाईन्स येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

अतिशय साधे-सोज्वळ व्यक्तिमत्त्व असलेल्या सुलोचना चव्हाण यांचे लावणी या संगीत प्रकाराशी आकस्मिक जुळलेले नाते अखेरपर्यंत अतूट राहिले. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात पार्श्वगायनाची सुरुवात करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाला तिथेही रसिकदाद मिळाली. अगदी लहानपणी ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिले हिंदी गीत गायले होते.

चित्रपट संगीत गायनात रमलेल्या सुलोचना यांच्या आयुष्यात संगीतकार वसंतराव पवार यांनी केलेल्या आग्रहाखातर लावणीचा प्रवेश झाला. सुरुवातीला लावणी गायनासाठी त्या मनापासून तयार नव्हत्या. मात्र त्यांच्या आवाजात ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची..’ ही पहिली लावणी ध्वनीमुद्रित झाली आणि मग ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘पदरावरती जरतारीचा’ अशा त्यांनी गायलेल्या अनेक बहारदार लावण्यांनी महाराष्ट्राला वेड लावले.

कलेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सुलोचना चव्हाण यांना यंदा ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते. चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांनी हा सन्मान स्वीकारला. लावणी गायनाने मला प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे हजारो कार्यक्रम केले, असे नम्रपणे त्यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेडय़ात लावणी गायनाचा कार्यक्रम करू शकलो आणि या संगीत प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकलो अशी समाधानाची भावनाही सुलोचना यांनी अनेकदा व्यक्त केली होती.

गिरगवात जन्मलेल्या मूळच्या सुलोचना कदम यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. त्यांच्या घरी त्यांचे मोठे बंधू दीनानाथ यांनी ‘श्रीकृष्ण बाळमेळा’ सुरू केला होता. या मेळय़ात काही भजने आणि गाणी गाणाऱ्या सुलोचना यांचा आवाज रंगभूषाकार दांडेकर यांनी ऐकला. त्यांनी संगीत दिग्दर्शक श्यामाबाबू पाठक यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली आणि ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटातील गाण्याने त्यांच्या गायन कारकिर्दीचा प्रारंभ झाला.

शास्त्रीय संगीताचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना, केवळ आवड म्हणून गाण्याकडे वळलेल्या सुलोचना यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून पार्श्वगायनास सुरुवात केली. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर त्यांनी गायन केले. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हूं’, ‘नजर से नजर लड गई’, ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’ अशी हिंदी चित्रपटातील जवळपास अडीचशे गाणी त्यांनी गायली. गाण्यांचा ताल, लय समजून घेत त्यांचा अभ्यास करण्याचे त्यांचे कौशल्य स्तिमित करणारे होते. मराठी, हिंदीबरोबरच पंजाबी आणि गुजराती भाषेतही त्यांनी पार्श्वगायन केले.

लावणी गाण्यासाठी पती चित्रपट दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांनीच आपल्याला प्रोत्साहन दिले असे सुलोचना चव्हाण सांगत असत. संगीतकार वसंतराव पवार यांनी श्यामरावांकडे ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील ‘नाव, गाव कशाला पुसता’ ही लावणी सुलोचना यांच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे असा आग्रह धरला होता. जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली ही लावणी सुलोचना यांनी गायली आणि त्यांचे अवघे आयुष्यच लावणीमय होऊन गेले. ‘मल्हारी मरतड’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’ अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या.

लावणीतला ठसका, त्यातला श्रृंगार, खटय़ाळपणा त्यांनी आपल्या आवाजातून लोकांपर्यंत पुरेपूर पोहोचवला. त्यांच्या याच ठसकेबाज लावण्यांमुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ हा किताब दिला. लावणी गायनाने त्यांना अनेक मान-सन्मान मिळवून दिले. ‘पी. सावळाराम-गंगा जमना’ पुरस्कार आणि संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. ‘माझे गाणे माझे जगणे’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.

कोणतेही संगीत हे कमी दर्जाचे नसते, प्रत्येक संगीत प्रकाराची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़े आहेत, असे त्या म्हणत असत. लावणी या संगीत प्रकाराची वैशिष्टय़े ओळखून ती आत्मसात करणाऱ्या आणि मनापासून लावणी महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या सुलोचना चव्हाण या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *