पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये दोन रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आता वाहन चालकांना बुधवारी मध्यरात्रीबारानंतर एक किलो सीएनजीसाठी ८२ रूपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांना वाढ करण्यात आली आहे.
२८ एप्रिल २०२२ च्या मध्यरात्रीपासून पुण्यात सीएनजीचा दर ७७.२० झाला होता. त्यानंतर २० मेच्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात दोन रूपयांनी पुन्हा वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा बुधवारी मध्यरात्रीपासून पासून पुन्हा दोन रूपयांनी सीएनजी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात आता एक किलो सीएनजीसाठी वाहन चालकांना ८२ रूपये मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांत ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’चा पुरवठा केला जातो. ‘एमएनजीएल’चे पुणे परिसरात १०८ सीएनजी पंप आहेत. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो.
