पत्नी मुलांसह स्वित्झर्लंडला गेली, पतीची आत्महत्या, चारपानी सुसाईड नोट

पत्नीसोबतच्या ताणलेल्या संबंधांमुळे नैराश्य आल्याने पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेश धर त्रिपाठी असं मयत 41 वर्षीय पतीचं नाव आहे. तो दिल्लीतील पूर्व उत्तम नगर येथील रहिवासी होता. पत्नी मुलांसह स्वित्झर्लंडला गेल्यामुळे तो निराश होता. चार पानी सुसाईड नोटमध्ये त्याने याबाबत उल्लेख केला आहे. राहत्या घरातील खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत उमेशचा मृतदेह सापडला होता.

मृत पतीने चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. आपली पत्नी मुलांसह स्वित्झर्लंडला गेल्याचे उमेशने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच पत्नीने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचाही उल्लेख त्याने नोटमध्ये केला आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

“आम्ही मयत व्यक्तीने लिहिलेली सुसाईड नोट तपासून पाहिली आहे. त्या व्यक्तीची पत्नी आपल्या मुलांसह स्वित्झर्लंडला गेल्याचे आम्हाला आढळले. पती-पत्नी दोघांमधील नातेसंबंध ताणले गेल्याचे त्याने नमूद केले आहे. तसेच पत्नीने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला होता, असेही त्याने चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. यामुळे नैराश्य येऊन त्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.” असं द्वारकाचे डीसीपी शंकर चौधरी यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना पीसीआर कॉल आला. सुसाईड नोट व्यतिरिक्त, अधिकाऱ्यांनी मृताच्या ताब्यातून एक मोबाईल फोन आणि पाकीट जप्त केले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, घरात एकट्याच राहणाऱ्या या व्यक्तीने सोमवारी आत्महत्या केली.

पोलिसांनी चौकशी सुरु केली असून कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. कुटुंबाने कुठलीही संशयास्पद गोष्ट घडल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *