कारला अचानक लागली आग, दरवाजाही होता लॉक; पुण्यातील इंजिनिअरचा होरपळून मृत्यू

 मध्य प्रदेशातील बैतुल येथे महामार्गावर कारला अचानक आग लागल्याने चालकाचं नियंत्रण सुटून कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील इंजिनिअर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनील सिद्दप्पा असं ३९ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. परासिया राज्य महामार्गावर गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सिद्दप्पा हे पुण्यातून एका लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्या सासरी बैतुल येथे गेले होते. लग्नसोहळ्यासोबत परिसरात फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी सुनील हे घराबाहेर पडले. मार्ग परासिया महामार्गावर त्यांच्या कारने पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीमुळे सुनील यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला धडकली. या अपघातात सुनील सिद्दप्पा यांचा जागीच मृत्यू झाला.

कारला आग लागल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र ही आग विझवण्यात नागरिकांना अपयश आलं. तसंच कारजे दरवाजे लॉक असल्याने सुनील यांना बाहेर काढणं शक्य झालं नाही आणि त्यांनी होरपळून आपले प्राण गमावले. काही वेळानंतर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

दरम्यान, घरातील कर्ताधर्ता व्यक्ती गमावल्याने सिद्दप्पा कुटुंबाला मोठा धक्का पसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *