कामाच्या बहाण्याने महिलेला लुटले

काम देण्याच्या बहाण्याने महिलेला हॉटेलमध्ये नेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना चऱ्होली परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला विश्रांतवाडी परिसरात घरकाम करतात. टिंगरेनगर परिसरातील एका घरी त्या सकाळी साडेनऊच्या सुमारास कामाला जात होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांना थांबविले. ‘मी तुमच्या मुलाचा मित्र असून, मी तुम्हाला एक काम मिळवून देतो,’ असे या चोरट्याने त्यांना सांगितले. त्यानंतर चोरटा महिलेला दुचाकीवर घेऊन आळंदी रस्त्यावरील चऱ्होली परिसरात गेला. तेथील एका हॉटेलमधील खोलीत महिलेला नेले. याच हॉटेलमध्ये काम असल्याची बतावणी चोरट्याने केली. महिलेला धमकावून तिच्या गळ्यातील एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार झाला. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात येत आहे. सहायक निरीक्षक सचिन निकम तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *