भारताबरोबरील संबंध दृढ करण्यासाठी उत्सुक असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने (युएई) “मेक इन इंडिया‘, “डिजीटल इंडिया‘ आणि “स्मार्ट सिटीज‘ या भारतीय सरकारच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.
“भारतामधील विविध क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची आमची इच्छा आहे. विशेषत: मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया आणि स्मार्ट सिटी या प्रकल्पांसंदर्भांत आम्ही उत्सुक आहोत,‘‘ असे युएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांनी सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करत नहयान यांनी भारताबरोबरील संबंध नव्या व्यूहात्मक पातळीवर नेण्यासाठी युएई कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएईचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यादरम्यान येत्या पाच वर्षांमध्ये द्विपक्षीय व्यापारामध्ये 60 टक्क्यांची वाढ करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यामध्ये आगामी वर्षांमध्ये भारतामधील पायाभूत सुविधांमध्ये युएई सुमारे 75 अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करण्यासंदर्भातील घटकाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय गृहबांधणी व स्वच्छ उर्जा या क्षेत्रांमध्येही भारतास युएईकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.
