सातारा जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये मारामारी

सातारा जिल्हा कारागृहातील बराकीमध्ये दोन न्यायालयीन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून मारामारी झाली. यामध्ये एक कैदी जखमी झाला असून या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा कारागृहातील सर्कल एक क्रमांकाच्या बराकीमध्ये दोन न्यायालयीन कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून हल्ली वाद होत होते. या प्रकरणी विकास भीमराव बैले (रा. कुशी, ता. पाटण) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैले हा एका गुन्ह्यातील संशयित असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला सर्कल क्रमांक एकच्या बराकीत ठेवण्यात आले आहे. याच बराकीमध्ये अक्षय दिनकर यादव या न्यायालयीन बंदीस कारागृह प्रशासनाने ठेवले आहे. या बराकीत बैले आणि यादव या दोघांमध्ये काही कारणाने किरकोळ वाद होत होते. याच वादातून चिडून जाऊन बैले याने यादव याला मारहाण केली. या मारामारीत यादवच्या तोंडाला मार लागल्याने तो जखमी झाला. ही बाब कारागृह प्रशासनास व कर्मचाऱ्यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही बैले याने यादव याला दिली. तपासणीदरम्यान यादव हा जखमी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. चौकशी दरम्यान यादव याला बैलेने मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने प्रशासनास सांगितले. त्यानुसार कारागृह रक्षक सखाहारी शिंदे यांनी शनिवारी (दि. १) सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बैले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक ए. ए. वाघमोडे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *