आकाशातून पडलेले ‘ते’ ‘इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर’चे अवशेष?

सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे आकाशातून पडलेली लोखंडी शिंग, पवनपार, गुंजेवाही येथे मिळालेला गोलाकार अवशेष तथा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे मिळालेले सिलेंडरच्या आकाराचे अवशेष न्यूझीलंडच्या ‘ब्लॅक स्काय’ उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाणारे ‘इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर’चे अवशेष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सिंदेवाही तथा समुद्रपूर पोलिसांनी अवशेष ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
दरम्यान, रॉकेटच्या तुकडय़ांच्या तपासणीसाठी तज्ज्ञांची पाच सदस्यांचे पथक तयार करणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. शनिवार, २ एप्रिलचे संध्याकाळी ७.४५ वाजता आकाशातून मोठय़ा आकाराचे आगीचे गोळे पडताना पाहिले. या उल्का पडल्या असाव्या असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र न्यूझीलंड देशाचे ‘ब्लँक स्काय’ नावाचा उपग्रह संध्याकाळी ६.१०ला सोडण्यात आला होता. ती वेळ आणि मार्ग पाहता हे त्याच रॉकेटचे तुकडे असावेत, असा अंदाज आहे.
चीनचे सुद्धा एक रॉकेट पडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्याची शक्यता वाटत नाही. पडलेल्या अवकाशीय वस्तूंची पाहणी केली असता लाडबोरी येथे पडलेला रॉकेटचा बाह्य पत्रा आणि पवनपारजवळ एक गोल आकाराचा हायड्रोजन स्पिअर हा इंधन दाब नियंत्रण करणारी गोल सिलिंडर आढळले. अजूनही काही वस्तू परिसरात आढळण्याची शक्यता आहे.
निरीक्षणावरून या अवकाशीय वस्तू उपग्रहाच्या रॉकेटचीच असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही गोल शिंग १० बाय १० फूट व्यास, ८ इंच रुंद आणि ४० किलोची आहे. तर दुसरी गोल वस्तू रॉकेटचाच एक भाग असून ती दोन फूट व्यासाची आढळली. लाडबोरी येथे लोखंडी शिंग पडताना गावातील नऊ जणांच्या समूहाला सर्वप्रथम दिसली.
लाडबोरी गावात अगदी सभोवताली घरे असताना अगदी त्यांच्या मधोमध ही ५० किलो वजनाची तप्त शिंग पडली आणि फार मोठा अनर्थ टळला. अन्यथा तेथील घरे जळून प्राणहानी झाली असती. तहसील आणि जिल्हा प्रशासन परिसरातील सर्व संभाव्य वस्तू गोळा करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवणार असून पडलेल्या वस्तूंची पाहणी आणि ओळख करण्यासाठी तंत्रज्ञांचे पथक बोलवणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गुल्हाने यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याची गंभीर दखल घेत वस्तूंची पाहणी करण्यासाठी खगोल अभ्यासक तथा इतर तज्ज्ञांचा समावेश असलेली पाच सदस्यीय पथक गठित करून तपास करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. चौकट एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी लोखंडी शिंग, गोलाकार तथा सिलेंडरच्या आकाराचे अवशेष हे ‘इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर’चे तुकडे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
चंद्रपुरातील ‘स्कॉय वॉच ग्रुप’चे प्रा.डॉ. योगेश दुधपचारे, प्रा. सचिन वझलवार व सुरेश चोपणे यांनी लाडबोरी, पवनपार, समुद्रपूर येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन अवकाशीय वस्तूची पाहणी केली असता त्यात काल पडलेली शिंग आणि आज आढळलेली गोलवस्तू ह्या न्यूझीलंडच्या ब्लँक स्काय उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाणारे रॉकेटचे अवशेष आहेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. प्रशासन तंत्रज्ञाची चमू बोलावून त्या अवकाशीय वस्तूंची खात्री करावी आणि दोषी देश-संस्थांवर कारवाही करावी, अशी मागणी ‘स्काय वाच ग्रुप’तर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *