मराठवाडय़ातील पहिले आयुष्य रुग्णालय हे भूकंपग्रस्त म्हणून ओळख निर्माण झालेल्या किल्लारीत उभारण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० खाटांच्या या रुग्णालयाला केंद्रस्तरावरून नुकतीच मंजुरी मिळाली असून उभारणीसाठी ९ कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी उद्यान व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडाही सादर करण्यात आला आहे. या आयुष रुग्णालयायाचा फायदा लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यमसह मराठवाडय़ातील नागरिकांना होणार आहे. औसा तालुक्यातील किल्लारीत मराठवाडय़ातील पहिले आयुष रुग्णालय उभे राहावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार अभिमन्यू पवार यांनी २७ जुलै २०२१ रोजी केंद्रीय आयुष तथा बंदरे, जहाज बांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंदा सोनोवाल यांची दिल्लीत भेट घेतली होती. किल्लारीतील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचे आयुष रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच किल्लारीत आयुष रुग्णालयासाठी मुबलक जागा उपलब्ध असून या भूकंपग्रस्त भागात रुग्णालयाची गरज असल्याचे निदर्शनासून आणून दिले होते. त्यानंतर आमदार पवार यांनी पाठपुरावाही केला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीयमंत्री सोनोवाल यांना पत्राद्वारे आयुष रुग्णालय उभारण्याची गरज असल्याचे कळवले होते. अखेर केंद्रस्तरावरून किल्लारीतील आयुष रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. आयुष मंत्रालयाने आयुष रुग्णालयासाठी ९ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.
दरम्यान, आमदार पवार यांनी कोविड काळात आरोग्य सुविधेसाठी दिलेल्या निधी व साहित्यासंबंधीची माहितीही दिली. मतदारसंघातील आरोग्य सेवा सक्षम असावी यासाठी आरोग्य केंद्रांना स्थानिक विकास निधीतून ९ तर क्रिएटिव्ह फाऊंडेशन व आपल्या पुढाकाराने ६ अशा १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. कोविड काळात रुग्णांच्या उपचारासाठी औसा, किल्लारी, कासारसिरसी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर खरेदी करिता ३० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. मतदारसंघातील सर्व ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ३ ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आवशक खाटा आमदार निधी अंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत. आमदार विकास निधीतून लातूर येथे जंम्बो कोविड हॉस्पिटल व औसा येथे डेडिकेटेड कोविड रुग्णालयास आवश्यक यंत्र सामुग्री व साहित्य खरेदीसाठी १ कोटी रुपये दिले होते, असे आमदार पवार यांनी सांगितले.
किल्लारीत मराठवाडय़ातील पहिले आयुष रुग्णालय उभे राहावे, यासाठी केंद्रीयमंत्री सर्बानंदा सोनोवाल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळून ९ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रव्यवहार केला होता.
