हिंदुस्थानी भाऊला अटक, विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप

दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिल्याचे समोर आल्यानंतर धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खान वखान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खानला अटक करण्यात आली आहे.

करोना काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी काल, सोमवारी मुंबईतील धारावीत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत हे आंदोलन केले होते. या आंदोलनाचे लोण पुणे, नागपूर आणि राज्यातील इतर भागात पसरले. हिंदुस्थानी भाऊ याने यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिले असल्याचे समोर आले.

वर्षभर ऑनलाइन शिक्षण झाल्याने दहावी व बारावीच्या परीक्षाही ऑनलाइनच घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे केली आहे. या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देणारा व्हिडीओ हिंदुस्थानी भाऊ या युट्यूब तसेच सोशल मीडिया हॅण्डलवरून व्हायरला झाला होता. त्यानंतर सोमवारी दुपारी अचानक राज्यातील विविध भागांत विद्यार्थ्यांची गर्दी जमू लागली. मुंबईत धारावीमध्ये जमा झालेली गर्दी पाहून सर्व यंत्रणाच अवाक झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा होईल, असा अंदाज कुणालाच नव्हता. या विद्यार्थ्यांनी गायकवाड यांना घेराव घालत आपली मागणी समोर ठेवली. यावेळी पाठक यांनी तेथे येऊन भाषण केले. तेव्हा याबाबत चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सरकारकडे यावे, असे आवाहन गायकवाड यांनी दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे पाठक यांनी जाहीर केले. पाठक यांचे यूट्युब चॅनेल असून, तेथे तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *