सणासुदीच्या काळात खासगी बसचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून आले आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जादा तिकीटदर आकारल्याच्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) व्हॉट्सॲपवर आतापर्यंत ४३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन ‘आरटीओ’ने २० खासगी बस चालकांना नोटिसा बजावल्या आहेत; तसेच प्रत्यक्ष तपासणीत २३ खासगी बस चालकांवर जादा भाडे घेतल्याची कारवाई केली आहे.
दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे खासगी बस चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यात येते. ‘आरटीओ’ने खासगी बस चालकांची बैठक घेऊन नियमापेक्षा जास्त भाडे न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या; तसेच असे प्रकार आढळून आल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. नागरिकांना व्हॉट्सॲप व ई-मेलवर तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ४३ नागरिकांनी आतापर्यंत जादा तिकीट घेतल्याची तक्रार केली.
