कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच चोरीमागील एक धक्कादायक कारण समोर आले आहे. इचलकरंजीमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाला दुचाकी चोरीची सवय लागली होती. चोरी केलेल्या दुचाकी स्वतःकडे न ठेवता त्या वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाण ठेवायच्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळायचा, असा त्याचा प्रकार सुरू होता. शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या तरुणाला अटक करून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 16 दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
प्रदीप बाळू मस्के (वय 24, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. इचलकरंजीतील अल्ताफ सद्दाम सनदी यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला. शहरातील वाहनचोरीच्या घटनांचा माग काढताना पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला. या तपासातून प्रदीप मस्के याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या दुचाकींचे मोठे प्रकरण उघडकीस आले.
गहाण ठेवलेल्या दुचाकींच्या पैशांत कॅसिनोचा खेळ
चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करण्याऐवजी मस्के त्या वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाण ठेवत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तो गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. फळ विक्रीच्या व्यवसायाच्या आडून त्याने वाहनचोरीचे सत्र सुरू ठेवल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीवर प्रकाश पडला आहे.
