शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांवर भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या समस्येवर आता थेट महासभेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रभावी उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.
शहरात जवळपास १६ हजार भटके कुत्रे
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात जवळपास १६ हजार भटके कुत्रे आहेत. दर वर्षी तब्बल १५ ते २० हजार नागरिकांना कुत्रे चावा घेत असल्याची आकडेवारी समोर येते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटना घडत असतानाही भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम अपेक्षित वेगाने राबवली जात नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महासभेत हा विषय चर्चेला घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
अन्य कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
प्रत्येक प्रभागात स्वतंत्र डॉग हेल्पलाइन , पिंजरा गाडीसह कुत्रे पकडणारे पथक तैनात करणे, तक्रार मिळाल्यानंतर दोन तासांत कारवाई करणे, निर्बीजीकरण मोहिमेला गती देणे, तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय उघड्यावर चिकन-मटण आणि अन्य कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
महासभेत चर्चा होणे अपेक्षित
विशेष म्हणजे, यापूर्वीही निर्बीजीकरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, त्याबाबतही महासभेत चर्चा होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या चाव्याच्या घटना आणि इतर माहितीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रस्ते,चौकात कळप
उल्हासनगर शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि निवासी परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात. विशेष: रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी मुले आणि वृद्धांवर श्वानांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, दुचाकीस्वारांचाही पाठलाग केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
