पैठण तालुक्यातील नांदर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पित्याच्या नात्याला कलंक लावत एका निर्दयी बापाने आपल्याच पोटच्या दोन चिमुकल्यांना चॉकलेट आणि वडापावचे आमिष दाखवून जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
श्याम सोमनाथ रोडगे (वय ५ वर्ष), आर्यन सोमनाथ रोडगे (वय ७ वर्ष) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत, तर सोमनाथ दामोधर रोडगे (वय ३२ वर्ष, रा. नांदर, ता. पैठण) असे आरोपी पित्याचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी पिता सोमनाथ रोडगे याने त्याची दोन लहान मुले श्याम आणि आर्यन यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्यांना थेट जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेले. तिथे दोन्ही मुलांना चॉकलेट व वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांना पाण्याच्या प्रवाहात ढकलून दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विशेष म्हणजे, हा अमानुष प्रकार घडत असताना काही नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधम बापाने त्यांनाही दमदाटी करत त्यांच्यावर दगडफेक केली आणि शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी पिता सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले.
पाचोड पोलिसांच्या उल्लेखाने ट्विस्ट
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली. मात्र, दुसरीकडे पाचोड पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला मदतीसाठी पाठवलेल्या अधिकृत पत्रात, वडील शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेले असता मुले कालव्यात वाहून गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा घातपात आहे की दुर्दैवी अपघात, याविषयी संभ्रम निर्माण झाला असून पोलीस या दोन्ही बाजूंनी कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, कालव्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेलेल्या दोन्ही लहान मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. जन्मदात्या बापानेच असा टोकाचा आणि क्रूर निर्णय का घेतला, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या हृदयद्रावक घटनेमुळे नांदर गावावर शोककळा पसरली आहे.
