राहत्या घराजवळ हल्लेखोरांनी डाव साधला, शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगेंना जागीच संपवलं; विठ्ठलाच्या पंढरीत खळबळ

पंढरपूर शहरात काल मंगळवारी गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये राजाभाऊ भिंगे याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गोळी झाडली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गोळी लागल्यानं राजाभाऊ भिंगे हे गंभीर जखमी झाले होते.

उपचारादरम्यान भिंगे याचा मृत्यू

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर हॉस्पिटलबाहेर त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पूर्ववैमनस्यातून की अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आरोपींचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून राजाभाऊ भिंगे यांची हत्या केलेल्या आरोपींचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलं आहे. तसेच शहरात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. या घटनेमुळे पंढरपूरात भीतीचं वातावरण पसरलं असून, पुढील तपासानंतरच गोळीबाराचं नेमकं कारण समोर येणार आहे.

तरण्याबांड पोराचा शॉपमध्येच काटा काढला

दरम्यान, सोलापुरात काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडली होती. याठिकाणी एका तरुणाचा मोबाईल शॉपमध्ये घुसूनच हत्या करण्यात आली होती. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मोबाईल दुकानात घुसत एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ही गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी सोलापूर जिल्ह्यातील दुधनी येथे घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *