पुण्यातील विवाहित एअरहॉस्टेसची हत्या, मित्रावर पतीचा खळबळजनक आरोप; तर आई म्हणाली वर्षाने फ्लॅट विकून 60 लाख दिलेले

पुण्यात राहणारी ३५ वर्षीय विवाहित एअर हॉस्टेस वर्षा तुरकर हिच्या हत्येला ४८ तासांहून अधिक काळ उलटूनही, तपास पथके अजूनही घटनाक्रमाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना हा एक सुनियोजित गुन्हा असल्याचा संशय असून, तपासादरम्यान ही ‘सुपारी देऊन केलेली हत्या’ (कॉन्ट्रॅक्ट किलिंग) असण्याची शक्यताही समोर आली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी वनक्षेत्रात वैनगंगा नदीच्या परिसरात वर्षा तुरकर हिचं शव सापडलं होतं.

पोलिसांनी काय सांगितलं?

गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले की, “घाईघाईने कोणताही निष्कर्ष न काढता अत्यंत काळजीपूर्वक तपास केला जात आहे. वर्षा तुरकर दिवाळीनिमित्त आपल्या लहान मुलीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही येथे असलेल्या माहेरी आल्या होत्या. १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी एका ओळखीच्या व्यक्तीसोबत बाहेर गेल्या असताना, त्यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.”

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही या प्रकरणात लक्ष घालून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या विषयावर पोलीस अधीक्षक भामरे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून हत्येवेळी वर्षासोबत असलेला मित्र नितेश अग्रवाल याच्याकडे चौकशी केली जात आहे. नितेश याच्यासोबत वर्षा यांची महाविद्यालयीन काळापासून ओळख असल्याचे बोलले जाते.

वर्षाच्या पतीचा खळबळजनक दावा

दरम्यान, वर्षा तुरकर हिच्या पतीने असा दावा केला आहे की, तिने मित्र नितेश अग्रवाल याला १५ लाख रुपये दिले होते. पोलीस या दाव्याची पडताळणी बँक तपशील आणि व्यवहारांच्या नोंदींच्या आधारे करत आहेत.

वर्षाची आई काय म्हणाली?

“नितेशनेच फोन केला, की वर्षाला चाकूला मारलाय, थोड्या वेळाने फोन केला हॉस्पिटलला नेलंय, त्यामुळे आम्हाला त्याच्यावरच संशय आहे, की त्याचाच सगळा खेळ आहे, त्याच्याच कुटुंबाचा हात आहे, वर्षाने नितेशला बिझनेस विस्तारासाठी ६० लाख रुपये दिले होते. वर्षाने नागपूरचा फ्लॅट विकला होता. त्यांच्यात देवाणघेवाणीवरुन काही वाद झाल्याची शंका वाटते.” अशी प्रतिक्रिया वर्षाची आई प्रमिला तुरकर यांनी दिली.

वर्षाच्या बहिणीचे गंभीर आरोप

नितेश म्हणतो की लूटमार झाली, पण दीदीची चेन, रिंग सगळं तसंच होतं. तिच्यासोबत असलेल्या नितेश अग्रवालच्या गळ्यात चेन नव्हती. त्याच्या अंगावर जखम काय, साधा ओरखडाही नव्हता. माझ्या दीदीवर दोन-तीन चाकूचे वार होते, असं कसं होईल? नितेश किंवा त्याच्या कुटुंबाचाच हात वाटतो, अशी मागणी वर्षाची बहीण निशा पटले हिने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *