औरंगाबादच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पांढरी पिंपळगाव परिसरात अंगावर शहारे आणणारा अपघात घडला असून, मद्यधुंद कंटेनर अपघातातील स्कुटी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेली. ही घटना आज ( सोमवारी ) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली असून, नारायण पंडितराव राऊत (वय ७०, रा.हर्षी खुर्द. ता.पैठण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राऊत हे हर्षी खुर्द येथील पोलीस पाटील आहेत. तर सोमवारी ते औरंगाबाद शहरामध्ये राहत असलेल्या पत्नी व मुलाला भेटण्यासाठी गावाकडच्या घरुन औरंगाबादकडे मोपेड स्कुटीवरून निघाले होते. यावेळी पांढरी पिंपळगाव जवळ येताच पाठीमागून येणाऱ्या कंटनेरने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, राऊत हे कंटेनरच्या धडकेत चिरडले गेले. राऊत यांच्या डोक्यावरुन कंटेनरचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडताच मद्यधुंद कंटेनर चालकाने वाहन घटनास्थळी न थांबविता तेथून कंटेनरसह पळ काढला. यावेळी अपघातात कंटेनरमध्ये स्कुटी अडकल्याने तेही या चालकाने फरफटत नेली. मात्र घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी कंटेनरचा पाठलाग केल्याने, अखेर चालकाने कंटेनर एका पेट्रोल पंपमध्ये घातला. मात्र घटनास्थळापासून तब्बल पाच किलोमीटरपर्यंत स्कुटी कंटेनरमध्ये अडकलेली होती आणि ती तशीच कंटेनर चालकाने फरफटत आणली.
