पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारचा भलताच उद्योग; ८२ वर्षीय नागरिकाचे १० कोटी रुपये लुटले, रोहन जाधवला अटक

तुमचे बँक खाते गुन्ह्यातील पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आले आहे. तुम्हाला अटक होऊ शकते,’ अशी भीती दाखवून ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये उकळणाऱ्या टोळीतील कथित ‘रीलस्टार’ला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी ‘सीबीआय अधिकारी’ असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावले होते. रोहन रामेश्वर जाधव (वय २६, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जाधव मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून, त्याचे ‘बीएससी’पर्यंत शिक्षण झाले आहे. समाजमाध्यमांवर तो ‘रीलस्टार’ म्हणून ओळखला जातो. टोळीशी संबंधित २९ गुन्हे उघड झाले असून, तपासात ५,४३६ बँक खात्यांमध्ये व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक कोटी ३४ लाख रुपये गोठविले आहेत.

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापूर्वी या प्रकरणात हर्षद सुभाष धनतोले (वय २६), समर्थ देशमुख (वय २४), अमर अत्तरगी (२४) आणि प्रणव करणसिंग आर्या (३१, रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले. या खात्याचा वापर एका गुन्ह्यात झाल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे, या खात्याशी संबंधित २४ जणांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे बँक खाते गुन्ह्यात वापरले गेल्याचे सांगितले. त्यांना आणि कुटुंबीयांना अटक होण्याची भीती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे एकूण १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली.

तपासादरम्यान ३० जानेवारीला एका खात्यात ७५ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. त्यानंतर त्यातून तीन खात्यांवर सहा लाख ५० हजार रुपये वर्ग झाले. बँक व्यवहार, सीसीटीव्ही आणि सायबर क्राइम पोर्टलवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहन जाधवचा माग काढला. त्याला पिंपळे गुरवमधून ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *