‘एक दारुची बॉटल कुठेय?’ संतापलेल्या नवऱ्यानं बायकोला निर्घृणपणे संपवलं, 10 वर्षाच्या नातवाने डोळ्यांनी पाहिलं

नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा-भिलगाव मार्गावरील खानवाणी लेआउट परिसरात दारू पिणं आणि जेवणावरून झालेला पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यानं पतीनं पत्नीचे डोके जमिनीवर आपटल्याची संतापजनक घटना काल रविवारी रात्री घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्यामवती उमाशंकर वट्टी (वय 60) असं मृत महिलेचं नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती उमाशंकर थानसिंग वट्टी (वय 65) याला अटक केली आहे.

दारुची एक बॉटल कुठे गेली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाशंकर वट्टी आणि त्यांची पत्नी श्यामवती हे मूळचे (नगरवाडा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा शिवारातील खानवाणी लेआउट येथे झोपडी टाकून राहत होते. नेहमीप्रमाणे काल रविवारी दिवसभर बांधकामाच्या ठिकाणी काम केल्यानंतर दोघंही रात्री आपल्या घरी परतले. यावेळी श्यामवती स्वयंपाक करत होत्या. दरम्यान, उमाशंकरने देशी दारूच्या दोन बॉटल आणल्या होत्या. त्यापैकी एक बाटली दिसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर, त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानं उमाशंकरने पत्नी श्यामवती यांचे डोके जमिनीवर आपटले.

210 वर्षांचा आपल्या डोळ्यांनी पाहिलं

या घटनेवेळी त्यांचा 10 वर्षांचा नातूही तेथे उपस्थित होता. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद पाहून त्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील श्यामवती यांना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषितकेलं. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी उमाशंकर वट्टी याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमका मृत्यू कशामुळे?

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार दारूच्या बाटलीवरून झालेल्या वादातून आरोपीनं पत्नीचं डोकं जमिनीवर आपटल्यानं तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहे.

पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

दिवसभराचे कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतले, कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि त्यानंतर काही वेळातच नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय पोलीस क्वार्टरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूर पोलीस आयुक्तालयातील अर्ज शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *