भारतात पूर्वीपासूनच अंधद्धेला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. सतीप्रथा, जातीव्यवस्था, सामाजिक असमानता अशा कितीतरी अंधश्रद्धा पूर्वीपासून प्रचलीत आहेत, यातील काही कुप्रथांना मूठमाती मिळाली असली तरी, काळ्या जादूची प्रथा आजही पहायला मिळते. कधी समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तर कधी कुठला तरी हव्यास पूर्ण करण्याकरिता काळ्या जादूचा आधार घेतला जातो. अशीच घटना सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत म्हणजेच डोंबिवलीत उघडकीस आली आहे. कळव्यात राहणाऱ्या एका गृहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार जळगावच्या कथित मांत्रिक तथा भोंदूबाबाला डोंबिवलीत येऊन करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली थोडथोडकं नव्हे तर तब्बल ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांचा गंडा घातला.
मात्र, गुन्हा दाखल होताच डोंबिवली पोलिसांनी या बदमाश भोंदूबाबच्या मुसक्या आवळल्या आवळत शनिवारी पहाटेच्या सुमारास जळगावमधून उचलून गजाआड केले. पवन बापुराव पाटील (२८) असे अटक करण्यात आलेल्या कथित मांत्रिकाचे नाव आहे. पवन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील गंजेवाड्यात राहणाऱ्या कथित मांत्रिकाने डिसेंबर २०१९ रोजी डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला ओम साई सोसायटीत राहणाऱ्या तक्रारदार गृहिणीची आई राहत असलेल्या घरी येऊन साऱ्यांना भुरळ घातली. त्या गृहिणीसह त्यांचा भाऊ आणि आईला त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले.
यासंदर्भात कळव्या मधील खारेगावातील रहाणाऱ्या एका गृहिणीने डोंबिवली (रामनगर) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यामधील भडगावातल्या गंजेवाडा-शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक कथित मांत्रिकाच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम २ (१), (ख), ३ (१), (२)अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले.
