चेन्नई सुपर किंग्जला नमवून दुस-यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावणा-या मुंबई इंडियन्सच्या विजयाचे आज वानखेडे स्टेडियमवर जोरदार सेलिब्रेशन होणार आहे.
संध्याकाळपासून वानखेडे स्टेडियमचे दरवाजे चाहत्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत. हा विजयी सेलिब्रेशनचा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला भारताचा महान क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकर, संघाच्या मालक नीता अंबानी उपस्थित रहाणार आहेत. रात्री आठ वाजता सेलिब्रेशन सोहळयाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
यापूर्वी झाला नसेल असा जल्लोष तुम्ही अनुभवाल असे संघाच्या अधिका-याने सांगितले. या सेलिब्रेशनच्या निमित्ताने संघाच्या चाहत्यांना प्रथमच संघाच्या विजयात सहभागी होता येणार आहे. २०१३ मध्ये विजयाचे सेलिब्रेशन मर्यादीत होते.