उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरमधील बीएसएनएल या दूरसंचार कंपनीच्या दुकानावर सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात एक जण ठार झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. सोपोरमधील इक्बाल मार्केट भागातील बीएसएनएलच्या दुकानावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात दुकानातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या मोहम्मद रफीकचा (२६) या कर्मचा-याचा रुग्णालयात मृत्यू झाला. तो हंडवाराचा रहिवाशी आहे.
मोहम्मद भट (४०) आणि इम्तियाज अहमद लोन (३०) हे सुध्दा जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा दूरसंचार कंपनीला लक्ष्य करण्याच्या इराद्याने झालेला हल्ला असू शकतो. यापूर्वी दहशतवादी संघटनांनी दूरसंचार कंपन्यांना धमकी दिली होती.
४८ तासांच्या आत झालेला हा असा दुसरा हल्ला आहे. २३ मे च्या रात्री दहशतवाद्यांनी मोबाईल टॉवरजवळ ग्रेनेड फेकले होते.